पाचोरा : प्रतिनिधी
‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना’ याचा प्रत्यय वरखेडीसह पंचक्रोशीत आला. आजारी असलेल्या वडिलांचा निरोप घेऊन तो दहावीच्या पेपरला गेला आणि तिथून परतल्यावर त्याला वडिलांच्या मृत्यूची वार्ताच समजली.
मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी खुर्द येथील रहिवासी दशरथ हरी पाटील (४१) यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा मुलगा शुभम हा लोहारा येथील परीक्षा केंद्रावर १० वीची परीक्षा देत आहे. शुक्रवारी त्याचा भूमितीचा पेपर असल्याने तो सकाळी ८:३० वाजता पेपर देण्यास गेला. जाण्यापूर्वी त्याने वडील दशरथ पाटील यांची भेट घेतली आणि मन घट्ट करीत तो पेपर देण्यासाठी पोहोचला.
तिकडे शुभम हा परीक्षा देण्यासाठी गेला आणि इकडे वडील दशरथ पाटील यांनी प्राण सोडला. दुपारी शुभम हा पेपर देऊन घरी आल्यानंतर २:३० वाजता वडिलांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शुभमने साश्रू नयनांनी पित्याच्या पार्थिवास अग्निडाग दिला. दशरथ पाटील यांचे आई-वडील हयात आहेत. आपल्या कर्त्या मुलाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाटील यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी व मुलगा शुभम असा परिवार आहे.