मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची संत मुक्ताबाई यात्रेत छेड काढल्या प्रकरणात सातपैकी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींच्या शोधार्थ तीन पथके स्थापन केली आहेत. फरार आरोपींमध्ये माजी नगरसेवक पीयूष मोरे, चेतन भोई आणि सचिन पालवे यांचा समावेश आहे. तर अटकेतील आरोपी अनिकेत भोई, किरण माळी आणि अनुज पाटील यांची पोलिस कोठडी ५ रोजी संपणार आहे. एक अल्पवीन आरोपी बालसुधार गृहात रवाना करण्यात आला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोथळी येथे संत मुक्ताबाई यात्रोत्सवात उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी तथा भाजप नेत्याच्या कन्येची व तिच्या मैत्रिणीची छेड काढण्यात आली होती. याप्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून २ मार्च रोजी येथील पोलिसात सात आरोपींविरुद्ध विनयभंग, पोक्सो तसेच आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत.