मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील संतोष देशमुख हत्येप्रकरणी वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. सोमवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. मुंडे यांचे पीए, ओएसडी यांनी ‘सागर’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला आहे. थोड्याच वेळात फडणवीस विधानभवनात राजीनाम्याची घोषणा करतील.
विविध भ्रष्टाचार प्रकरणात आरोप झालेले धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. धनंजय मुंडे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देतील असा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. मात्र, मुंडेंनी राजीनामा न दिल्याने त्यांचा दावा फोल ठरला होता. त्यानंतर करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून तो दोन तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असा नवा दावा केला होता. अखेर आज मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.