धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगाव येणाऱ्या डंपरने ओव्हरटेक करताना दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकीवरील चौघे जण जखमी झाले आहेत. तर या अपघातानंतर डंपर चालक डंपर काही अंतरावर सोडून पसार झाला आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंपळकोठा ते पिंप्री महामार्गावर जळगावकडून येणाऱ्या डंपरने ट्रकला ओव्हरटेक करताना फॅशन प्लस या दुचाकी (एमएच १९, बीए- ५२१६) ला धडक दिली. यात पिंप्री खुर्द येथील दुचाकीवरील भीमराव रमेश पाटील व त्यांचा मुलगा कुणाल भीमराव पाटील हे जखमी झाले आहेत. ते पिंपळकोठा गावात पाण्याचे जार भरण्यासाठी जात होते. याच वेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने मागाहून धडक दिली. त्यानंतर ही दुचाकी समोरून येणाऱ्या प्लॅटिना या दुचाकी (एमएच- १९, सीटी- ८३९३) वर जोराने आदळली. यात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला आहे. यात प्लॅटिना दुचाकीवर मुलीला सोडण्यासाठी जाणारे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. यात प्लॅटिनावरील सोहरसिंग श्रीकृष्णा पाटील व त्यांची कन्या कावेरी सोहरसिंग पाटील हे जखमी झाले आहेत. या दोघांचे पाय फ्रैक्चर झाल्याचे समजते. दरम्यान, या जखमींना एरंडोल येथील पद्मालय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर डंपर चालक तेथून पसार झाला आहे.