चाळीसगाव : प्रतिनिधी
मालेगाव रोडवरील वृंदावननगरमध्ये बंद घराचे कडीकुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेल्या १ लाख रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, वृंदावन नगरमध्ये राहणारे तुषार ईश्वर पाटील हे दि. १ मार्च रोजी घराला कुलूप लावून व बाहेरील गेट बंद करून कुटुंबासह गावी शिरसगाव येथे गेले होते. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ते कुटुंबासह चाळीसगाव येथील घरी आले तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला असलेला कडीकोयंडा तुटलेला दिसला. तर दरवाजा आतून बंद केलेला होता. त्यांनी घराच्या मागील दरवाजाने जाऊन पाहिले तर घराचा मागील दरवाजा उघडा होता व घरातील कपडे व वस्तू अस्ताव्यस्त दिसले. घरातील फर्निचर कपाटाचे ड्रॉवर उघडे होते. त्यातील रोख १ लाख रुपये व सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज मिळून आला नाही. या ऐवजाचा घरात तसेच आसपास शोध घेतला असता मिळून न आल्याने कोणीतरी चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
दि. १ मार्च रोजी दुपारी १ ते दि. ३ मार्चच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून १ लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तुषार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.