भुसावळ : प्रतिनिधी
शहरालगतच्या कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मागील बाजूस बंद पडलेल्या खोल्यांमध्ये बिबट्याने एका गाढवाची शिकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कारवाई केली.
रविवारी सायंकाळी केंद्रीय विद्यालयाजवळ बिबट्या दिसल्याने कंडारी आणि सुभाष नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाढवाच्या शिकारीचे तपशील तपासले. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले नसले तरी शिकारीची पद्धत बिबट्यासारखीच असल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कंडारी शिवारातील बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. रेल्वे क्वार्टर, ऑर्डनन्स फॅक्टरी आणि कंडारी परिसरातील नागरिकांनी सावध राहावे आणि आपल्या जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन कंडारी पोलिस पाटील रामा तायडे यांनी केले आहे. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठन आढळून आलेले नसले तरी शिकारी पद्धत ही बिबट्यासारखीच आहे त्यामुळे बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे