मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वात प्रामुख्याने मुद्दा हा शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात असणार आहे. तसेच अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल गरळ ओकणारी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. यात राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर असो. अशा प्रवृत्तीला चाप लावण्याकरता, कठोर कायदा करून त्यांना तात्काळ जेल बंद करावे, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या वेळी मिटकरी यांनी प्रशांत कोरटकर यांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, प्रशांत कोरटकरने दिलगिरी व्यक्त न करता, माफी न मागता, एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर स्वतःला उजागर समजतो. त्या पद्धतीने वर्तन केले आहे. ते खपवून घेतले जाणार नसल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. मोबाईल जप्त केला आणि माझा आवाज नसल्याचा दावा त्याचा असला तरी पोलिसांनी त्याचाच आवाज असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्य सरकारने कडक कायदा आणावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. याच विषयावर अर्धा तास चर्चा होणार असल्याची माहिती देखील मिटकरी यांनी दिली आहे.
संभाजी महाराजांची बदनामी करणारे विकृत पुस्तके आणि नाटके आजही उपलब्ध आहेत. तसेच या माध्यमातून चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय त्यांचा राजीनामा घेणार नाही, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी धनंजय मुंडे यांचे प्रकरण असो किंवा माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत भूमिका स्पष्ट करत भाष्य केले आहे. नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजेच दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे त्या नंतरच यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे.