जळगाव : प्रतिनिधी
आठवडे बाजारात भाजीपाला घ्यायला गेलेल्या विमल मंगा शिरसाठ (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपये व अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना पिंप्राळ्यातील गणपती नगरात घडली. ही रक्कम विमलबाई यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांभाळून ठेवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, विमल शिरसाठ यांचे पती आरोग्य विभागात नोकरीला होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्याने त्या गणपती नगरात एकट्याच राहतात. पेन्शनवर त्या उदरनिर्वाह करतात. बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार असल्याने सायंकाळी साडेसहा वाजता त्या बाजारात गेल्या होत्या. तेथून रात्री साडेआठ वाजता घरी आल्या असता, घराच्या पुढच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर घरातील कपाटही तुटलेले दिसले. त्या कपाटातील पर्समध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी २५ हजार रुपये ठेवलेले होते, ते गायब होते. घरातील अन्य साहित्यही अस्ताव्यस्त होते. पितळेचे पातेले, तांब्याची कळशीही गायब होती. हा प्रकार परिसरात राहणाऱ्या दोन्ही मुलांना सांगितला. त्यानंतर रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल केला आहे. हवालदार जितेंद्र राजपूत पुढील तपास करत आहेत.