जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करणाऱ्या अनिकेत विजय मौर्य (वय १८, रा. उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी, जळगाव) या परप्रांतीय तरुणाने सुप्रीम कॉलनी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत मौर्य हा वडील विजय मौर्य यांच्यासोबत सुप्रीम कॉलनी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका चटई कंपनीमध्ये काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. अनिकेतची आई व बहिणी मूळ गावाला आहेत. इकडे बापलेक दोघेच राहत होते. दोघांची कंपनीत रात्रपाळी ड्यूटी होती.
दरम्यान, शुक्रवारी रात्री वडील विजय मौर्य हे कंपनीत ड्यूटीला गेले तर अनिकेत हा कामावर गेलेला नव्हता. त्यामुळे तो एकटाच घरी होता. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ८.३० वाजता वडील विजय मौर्य कामावरून घरी आले असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खूप वेळा आवाज देऊनही घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना तसेच नातेवाइकांना बोलावले व दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अनिकेतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.