वरणगाव : प्रतिनिधी
येथील मुक्ताईनगर रस्त्यावरील गंगाबेन पटेल रुग्णालयास लागून असलेले तायबा टायर्स या दुकानाला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले.
मुस्लीम भाई अन्सारी यांच्या टायर दुकानाला आग लागली. यात दुकानातील नवीन व जुने टायर, तसेच दुकानासमोरील या दोन दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेले निजाम शेख यांचे चायनीजचे दुकान, इस्माइल शहा यांचे रेडिएटर शॉप, गॅरेज, मजहर ऑटो गॅरेज व इलेक्ट्रिक गॅस वेल्डिंग या दुकानांनाही आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच लोककल्याण हॉस्पिटलच्या आवारातील जुने मेडिकल साहित्य यात जळून खाक झाले आहे. वरणगाव फॅक्टरी अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात आली. जवान के. व्ही. सुरवाडे, डी. बी. वानखेडे, एम. एच. कोळी, एस. एम. पवार, ए. सी. झोपे, डी. एस. मेढे, आर. यू, पाटील, व्ही. डी. मोरे, एन. पी. पाटील, रवी ठाकूर यांनी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव, श्रावण जवरे, विजय बावस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही भीषण आग कोणत्या कारणामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किटने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत दहा ते पंधरा लाखांपर्यंतचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उशिरापर्यंत घटनास्थळाचे पंचनामा व पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते. आग लागल्याची वृत्त समजाच अनेक हात मदतीसाठी सरसावले.