एरंडोल : प्रतिनिधी
येथील रीलस्टार हितेश पाटील याच्या खूनप्रकरणी त्याचे वडील माजी सैनिक विठ्ठल सखाराम पाटील (५०) यांना खूनात मदत केल्याच्या संशयावरून त्यांचे बंधू नामदेव सखाराम पाटील (५५), त्याचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील (२८) आणि जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील (२४) यांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना ३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मारहाणीला कंटाळून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी मुलगा हितेश याचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर भवरखेडा गावापासून दोन ते अडीच कि.मी. अंतरावरील पाझर तलाव परिसरात त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. यानंतर स्वतः विठ्ठल पाटील यांनीही घरात आत्महत्या केली होती. ‘हितेशच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. भवरखेडा गावापासून थोड्या अंतरावरील धरणात त्याला बुजून आलो आहे. किती दिवस मुलाच्या हातून भार खाऊ’, अशी हतबलता विठ्ठल पाटील यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मांडली होती. या सुसाईट नोटमुळे सुरुवातीला बेपत्ता असलेल्या हितेशच्च्या खूनाचा उलगडा झाल्याने पोलिसही चक्रावले होते.
भवरखेडा गावापासून दोन ते अडीच कि. मी. अंतरावरील पाझर तलाव परिसरात गुरुवारी दुपारी पोलिस दाखल झाले होते. यावेळी धरणगावचे तहसीलदार महेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हितेशचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. अमळनेर विभागाचे डीवायएसपी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेप्रकरणी हितेशची पत्नी शीतल पाटील हिने फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, हितेश हा दारु प्यालानंतर सासरे विठ्ठल पाटील यांना मारहाण करीत होता. हितेश याचा ५ महिन्यांचा चिमुकला या घटनेमुळे पोरका झाला आहे.