मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक नेते, अभिनेते व उद्योजकांना नेहमीच धमकीचे फोन येत असतात मात्र आता मंत्रालयामधील मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्यात येईल असा धमकी देणारा मेसेज मुंबई वातूक पोलिसांना मिळाला आहे. व्हॉट्सॲपवर हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी वरळी पोलिसानी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार एका पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सॲपवर हा धमकीचा मेसेज आला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास हा मेसेज आला होता, त्यानंतर पोलिस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी तपास सुरू केला आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहाबाज हुमायून राजा देव असे नाव सांगितले, अशी माहिती समोर आली.
दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धमकी आली होती. त्यांची शासकीय गाडी उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. हा ईमेल मंत्रालय आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची कसून तपासणी करून बुलढाण्यातील दोन तरुणांना अटक केली होती. मंगेश वायळ आणि अभय शिंगणे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघेही बुलढाण्याती देऊळगाव राजा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली होती. धमकी देण्याचं कारण काय? त्यांच्या मागे आणखी कोणी आहे का? कुणाच्या सांगण्यावरून हा फोन केला का? आदी माहिती पोलीस घेत होते. ही घटना ताजी असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.