पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरातील स्वारगेट येथे काल पहाटे झालेल्या बलात्काराच्या प्रकारानंतर पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कालपासून स्वारगेटवर मंत्री किंवा इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या भेटी सुरू आहेत. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकाला कालपासून मिनी छावणीचे स्वरूप आले आहे. यातच आता काही वेळापूर्वीच हाय व्होल्टेज ड्रामा रंगला.
गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट आगारात दाखल झाले असता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या गाडीवर धावून गेल्या. देसाई यांच्या कृतीने तिथे एकच गोंधळ उडाला. यानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमधून घेऊन गेले. या सगळ्या प्रकरानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त पत्रकारांशी चर्चा न करता स्वारगेट आगारातून निघून गेले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक असून तेथेच पत्रकारांची संवाद साधणार आहेत.