बोदवड : प्रतिनिधी
शहरातील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात मंगळवारी रात्री चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. तसेच शेलवड गावाबाहेरील महादेवाच्या मंदिराची घंटा व त्रिशूलही चोरट्यांनी लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शहरातील कोटेचानगरमध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या गेटचे कुलूप बाजूला असलेल्या चावीने उघडले व मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आतमध्ये ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी फोडली.
दानपेटील रोख रक्कम काढून घेत बाजूला राख भरण्यासाठी ठेवलेल्या पिशवीत भरून गेटचे कुलूप पुन्हा लावून चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे सेवेकरी मंदिरात आले असता त्यांना दानपेटी फुटलेली, तर बाजूला जमिनीवर राख टाकलेली दिसून आली. दानपेटी ही दत्तजयंतीपासून उघडलेली नसल्याने जवळपास पन्नास हजारपर्यंत रक्कम असावी, असे सेवकऱ्यांनी सांगितले. दानपेटीत असलेली चिल्लर मात्र चोरट्यांनी तेथेच सोडून दिली. केवळ नोटा नेल्या. याबाबत बोदवड पोलिसांना केंद्रचालकाकडून माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत, तालुक्यातील शेलवड गावाबाहेर सूर नदीजवळ महादेवाचे मंदिर असून, त्यातील घंटा व त्रिशूलही चोरीला गेल्याचे भाविकांना दिसून आले. त्याचप्रमाणे महादेवाच्या बाजूने जमिनीत गाडलेला त्रिशूलही दिसून आला नाही. चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.