यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील राजोरा फाटा येथे मंगळवारी सकाळी यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीचा आणि भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. रुग्णवाहिका चालकाने जखमींना तातडीने भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
मिळालेली माहितीनुसार, राजोरा फाट्याजवळ दुचाकी क्रमांक (एमएच १९, ६६२९) वरून विजय भास्कर अटवाल (५८) व त्यांची पत्नी अलकाबाई विजय अटवाल (५३, रा. शिरसाड, ता. यावल) हे भुसावळ येथे लग्नाला जात होते. या दरम्यान, भुसावळकडून येणारी रुग्णवाहिका आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. रुग्णवाहिका चालकाने तातडीने जखमी अवस्थेतील दाम्पत्याला त्याच रुग्णवाहिकेतून भुसावळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघांवर उपचार करण्यात आले असून, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, सध्या विविध मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवास दिवसेंदिवस अधिक धोक्याचा ठरत आहे. याची दखल घेत उपायोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.