यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली येथे शेत विहिरीत बकऱ्यांसाठी पाणी भरण्याकरिता गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथील प्रज्ञा सुरेश साळुंखे ही तरुणी मंगळवारी बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. दरम्यान, तिचा पाय घसरला असावा आणि ती विहिरीत बुडाली असावी. ती मंगळवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले. मात्र, काहीही आढळले नाही. बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात करण्यात आली. पोलिस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली. यावल पो. नि. प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी पोलिस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी यांना पाठवले. तरुणीचा शोध घेण्याकरिता पाण्यात बुडणारे कॅमेरे सोडले. या कॅमेऱ्यांमध्ये ती विहिरीत खोल पाण्यात तळाशी असल्याचे दिसून आले. दुपारी दोन वाजता मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.