पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच आता पुण्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने तरुणीवर बलात्कार केला अन् पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळातच पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असून त्याचा शोध घातला जात आहे.
तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर ती एका ठिकाणी थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याची माहिती दिली. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने इसमाला सांगितले. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला शब्दात अडकवले.
या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर एसटी तर बंद आहे असं सांगितलं. तू टॉर्च लावून आत मध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिथून पसार झाला .घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथक आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.