जळगाव : प्रतिनिधी
व्यावसायिक सुनील झंवर यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करून घरी परतत असलेल्या सूरज झंवर यांच्या वाहनाला समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात सूरज झंवर यांच्यासह तिघे जखमी झाले असून चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. इंदौरजवळील मानपूर येथे सोमवारी रात्री १ वाजता हा अपघात झाला.
सविस्तर वृत्त असे कि, उद्योजक सुनील झंवर यांचे वडील देवकीनंदन झंवर यांचे नुकतेच निधन झाले. आजोबांच्या अस्थी विसर्जन करण्यासाठी नातू सूरज झंवर हा मित्र पलाश तोतला आणि आलोक शिवानी यांच्यासह हरिद्वार येथे गेला होता. विधी आटोपून ते दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहचले असता राजधानी एक्सप्रेस निघून गेले. रेल्वे सुटल्याने तिघे मित्र विमानाने इंदोर येथे पोहचले. त्याठिकाणी त्यांनी जळगावहून चालकाला कार घेऊन बोलावले होते. इंदोरहून रात्री १२ वाजता निघाल्यानंतर मानपूर गावच्या जवळ रात्री १ वाजेच्या सुमारास समोरून राँग साईड येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की वाहनाच्या एअर बॅग उघडल्या. अपघातात चालक मनोज सोनी याला गंभीर दुखापत झाली. तसेच सूरज झंवर, पलाश तोतला आणि आलोक शिवानी हे देखील जखमी झाले.