जळगाव : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले मार्केटमधील एका कपड्याच्या दुकानाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी १२:३० वाजता घडली. एका दुकानातील आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास लागले. फुले मार्केटमधील अतिक्रमणाचा फटका मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला.
जर या आगीचे स्वरूप जर मोठे राहिले असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. फुले मार्केटमध्ये करण श्रावणकुमार तलरेजा यांचे पूजा कलेक्शन नावाने कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास दुकानातील दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली.
आगीविषयी मनपा अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. लागलीच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पोहोचला. मात्र, फुले मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे अग्निशमन विभागाचा बंब मार्केटमध्ये जाऊ शकला नाही.