पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील कुन्हाड खुर्द येथे सप्टेंबर २०२४मध्ये झालेल्या बैलजोडी चोरीचा तपास पोलिसांनी लावला असून, या प्रकरणात सहापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, कुन्हाड खुर्द येथील नंदकिशोर वसंत शिंपी यांच्या मालकीची ४५ हजार रुपये किमतीची एक बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनला दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगाव हरे. पोलिसांनी या गुन्ह्याचा संयुक्तपणे तपास करत गुन्हा उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात गोपाळ शाम पांचाळ (वय २३), आशिष उत्तम पाटील (१८), अंकुश ऊर्फ आकाश दगडू तडवी (२०, कुन्हाड, ता. पाचोरा), गणेश रामचंद्र सोनवणे (२३, बनोटी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर), आकाश शांताराम ठाकरे (कुन्हाड, ता. पाचोरा), सचिन संजय भडांगे (कुन्हाड) यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यातील गोपाळ पांचाळ, आशिष पाटील, अंकुश ऊर्फ आकाश तडवी, गणेश सोनवणे यांना अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे, पोलिस निरीक्षक दिनेश भदाने, पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोबाळे, सहायक फौजदार अरविंद मोरे, पोलिस हे. कॉ. शैलेश चव्हाण, अतुल पवार, प्रमोद वाडीले, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन आदी कर्मचाऱ्यांनी या मोहीमेत सहभाग घेतला.