मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे, असा गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी केला. नीलम गोऱ्हे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर ठाकरे गटानेही सडेतोड उत्तर दिले. त्यांना 4 वेळा आमदार केले, त्यांनी 8 मर्सिडीझ दिल्या का? असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
सध्या दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे सहभागी झाल्या होत्या. संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला.
नेमके काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? कार्यकर्त्यांना कमी समजण्याचे कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसे आणली जायची. गल्ला गोळा करण्याचे काम एकनाथ शिंदेंना दिले होते, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की पदे मिळायची, असा खळबळजनक आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी या मुलाखतीत बोलताना केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असा दावाही नीलम गोऱ्हे यांनी केला.