मुंबई ; वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणूकिनंतर आता स्थानिक निवडणुकीकडे सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष आहे. त्यामुळे राज्यात गाठीभेटी सुरु झाल्यास असून आता शिंदेसेना मनसेही फोडण्याचा उद्योग करत असल्याने राज ठाकरे प्रचंड संतप्त झाले आहेत. त्यांनी आॅपरेशन टायगरचे जनक, उद्योगमंत्री उदय सामंत यांना आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी बोलावून घेतले आणि त्यांची खरडपट्टी काढली. मनसेच्या काही जिल्हाध्यक्षांना शिंदेसेनेने आॅफर दिल्याचे कळताच राज भडकले. दुसऱ्यांचे नेते किती दिवस पळवणार? पक्षबांधणीसाठी स्वतः पदाधिकारी घडवावे लागतात. मनसे फोडण्याचा विचारही करू नका, अशा शब्दात त्यांनी सामंत यांना सुनावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सामंत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही ऑफर दिली जात आहे. त्यासाठी सामंतांच्या पुढाकाराने मंत्री शंभूराज देसाईंच्या बंगल्यावर बैठक घेण्यात आली. शिंदेसेनेत प्रवेश केल्यास महामंडळ देऊ, असे आमिष दाखवण्यात आले. याविषयी पदाधिकाऱ्यांनी राज यांच्याकडे तक्रार केली म्हणून त्यांनी सामंतांशी बोलण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार राज यांनी कार्यवाही केल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज यांच्यासोबत तासभर झालेल्या या भेटीनंतर सामंत यांनी असा दावा केला की, माझ्या विनंतीवरून राज ठाकरे पुण्यातील विश्व मराठी संमेलनाला उपस्थित राहिले. त्यानंतर पुन्हा भेट झाली नव्हती. त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. आमच्यात मराठी भाषा, दिल्लीतील साहित्य संमेलनाविषयी गप्पा झाल्या. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.