भडगाव : प्रतिनिधी
भडगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवर आता मोठी कारवाई करीत दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई १७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आली. सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी, ता. भडगाव) असे अटक केले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, व्यवसाय – महा. बॅटरी दुकान, रा. हकीम नगर, भडगाव) यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान, भडगाव शहरातील बाळद रोड परिसरातून त्यांच्या दुकानासमोर उभी असलेली १०,००० रुपये किमतीची लाल रंगाची बजाज सी.टी. १०० मोटारसायकल (क्र. एमएच १९ एए १०९६) अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या सुचनेनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी, ता. भडगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस कोठडीत ठेवले असता, त्याने अजून एका मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी दोन्ही मोटारसायकली हस्तगत केल्या.
या कारवाईत सफौ प्रदीप चौधरी, पोहेकॉ निलेश ब्राम्हणकर, पोकॉ सुनिल राजपूत, पोकॉ प्रविण परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चोरीस गेलेल्या वाहनांची परतफेड होण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे तपास केला. सत्यपाल निकम याने शहरातील विविध भागांत मोटारसायकल चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या इतर गुन्ह्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील इतर संभाव्य आरोपींच्या तपासासाठी अधिक चौकशी सुरू केली आहे.