पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील पुणे येथील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याबाबतीत ते काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. त्याला कारणही तसेच आहे. रवींद्र धंगेकर यांनी व्हाट्सअपला स्टेटस ठेवत सगळ्यांच्या नजरा खिळवल्या आहेत. गळ्यात भगवा परिधान करून धंगेकर यांनी ‘शहा का रुतबा’ हे गाणे त्याला लावले आहे. त्यामुळे आता धंगेकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरूंग लावला होता. त्यामुळे त्यांची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर धंगेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पुण्यात केलेल्या आंदोलनाची देखील चांगलीच चर्चा झाली होती. मात्र, मधल्या काळात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. यातच काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रवींद्र धंगेकर यांना पक्ष निरीक्षकांच्या यादीतून डावलले होते. विधानसभा मतदारसंघात निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक पदाच्या नियुक्ती काँग्रेसकडून करण्यात आल्या. मात्र या यादीतून धंगेकरांना डावलण्यात आले होते. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आणि काँग्रेसने यादीतून डावलल्यामुळे धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला गेला होता.
पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र धंगेकर यांनीच याबाबत स्पष्टीकरण देत आपण काँग्रेस पक्षातच असल्याचे सांगितले होते. मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. माझ्या वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असे देखील त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यातच पक्षाच्या वतीने त्यांचे नाव डावल्यात आल्याने तसेच आता त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वरुन हीच चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. गळ्यात भगवा आणि त्याला सूचक गाणे, निवडल्यामुळे धंगेकरांची चर्चा रंगली आहे.