जळगाव : प्रतिनिधी
वजन कमी करण्याचे प्रॉडक्ट घेतले अन् तिथेच उद्योजकाला जाळ्यात अडकवून फ्रेंचाइजीच्या नावाने ३९ लाख ५० हजार रुपयात गंडविण्यात आले. अशोक गिरधर बियाणी (६८, रा. गणपतीनगर) असे उद्योजकाचे नाव आहे. दीपेश कमलेश रूपानी (रा. श्रीराम कॉलनी) व आकाश सूरजमल सिध्दू उर्फ आकाश वर्मा (रा. अमरावती) या दोघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अशोक बियाणी यांचा मुलगा निकुंज बियाणी याला दीपेश रूपानी याने हर्बोलाईफचे वजन कमी करण्याचे उत्पादन – विकत दिले होते. नंतर फ्रेंचाइजी घेण्याचा सल्ला देत गुंतवणूक करण्यास सांगितले. रूपानी व कंपनीचे व्यवस्थापक आकाश वर्मा या दोघांनी योजना सांगून फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांसह व्यवसायातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यांच्या फसवणूकीच्या घटना वारंवार घडत आहेत. अन्न व औषधचे परवाने, दुकान परवाना यासाठी ४ लाख ४० हजार रुपये घेऊन नंतर दुकानाचे डिपॉझिटसाठी ६० हजार घेतले. बियाणी पिता-पुत्रांनी पहिल्यांदा ४ लाख ४० हजार दुसऱ्यांदा १७लाख ५० हजार, तिसऱ्यांदा १७ लाख ६० हजार असे एकूण ३९ लाख ५० हजार या दोघांच्या सांगण्यावरून गुंतवणूक केली होती. ठरल्याप्रमाणे काही दिवस ७६ हजार रुपये प्रतिमहिना दराने पैसे मिळाले. नंतर आणखी गुंतवणुकीचा प्लॅन घेऊन बियाणी पितापुत्राला भाग पाडत होते. मात्र, त्यांनी अधिकची चौकशी केली असता हर्बोलाईफची सिस्टर कंपनी केअर न्युट्रिशन कंपनीच अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले.
फेब्रुवारी महिन्यात हर्बोलाईफचे प्रॉडक्ट विक्रीचे दुकानही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने बियाणी पिता-पुत्राने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहे.