जळगाव : प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातून जामीनावर सुटताच भावासोबत घरी शाहू नगराकडून जात असताना प्रतीक हरिदास निंबाळकर उर्फ पपई (२८, रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यानंतर मारेकरी तिथून लगेच पसार झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता शाहू नगरात घडली. भूषण भरत सोनवणे (वय २५. रा. इंद्रप्रस्थ नगर) याच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रतिक चार वर्षापासून कारागृहात होता. या खुनाचा बदला म्हणून प्रतिकच्या खुनाचा प्रयत्न झाला.
सविस्तर वृत्त असे कि, ८ नोव्हेंबर २०२० रोजी भूषण भरत सोनवणे उर्फ अठ्ठा याचा खून झाला होता. या गुन्ह्यात प्रतिकला अटक झाली होती. २१ रोजी सायंकाळी कारागृहातून सुटका झाली. प्रतिक याला ९ नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याची जालना कारागृहात रवानगी झाली होती. ५ डिसेंबर २०२२ रोजी त्याला जळगाव कारागृहात वर्ग केले होते. मध्यंतरी त्याने जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता त्याला जामीन मंजूर झाला. शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर ६.१५ वाजता त्याची कारागृहात सुटका झाली.
हा हल्ला चार वर्षापूर्वी खून झालेल्या भूषण सोनवणे याचा मामा देविदास उर्फ आबा सैंदाणे, भूषणचा भाऊ व देविदासचा मुलगा अशा तिघांनी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी दिली.
प्रतिक याचा जामीन झाल्याची कुणकुण लागल्याने मारेकऱ्यांनी त्याच्यावर कारागृहापासून पाळत ठेवली. तेथूनच काही जणांनी पाठलाग केला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या समोरील गल्लीत पोहोचताच त्यांच्या दुचाकीला धडक देऊन दोघांना खाली पाडले आणि हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक भरत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, संजय हिवरकर आदींसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले. पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी जीएमसीत येऊन जखमीच्या नातेवाईकांची भेट घेतली.