यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील परसाडे येथील शेतकऱ्याच्या खळ्याला गुरुवारी अचानक आग लागली. यातएका बैलाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुसरा बैल भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. खळ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, परसाडे येथील शेतकरी प्रभाकर शंकर पाटील यांचे गावालगत खळे आहे. या खळ्यात गुरुवारी अचानक आग लागली. आग लागल्याचे निर्दशनास येताच नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
यावल नगरपालिकेचा अग्निशमनबंबही दाखल झाला. फायरमॅन कल्पेश बारी, कैलास काटकर, शिवाजी पवार यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. आग लागताच नागरिकही मदतीला सरसावले. मात्र आगीचे रौद्ररूप धारण केले होते. यात बैलाचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जनावरे जखमी झाले. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
गोठ्यात आग लागल्याने बांधलेली दोन गुरे भाजली गेली. एकाचा मृत्यू झाला. आगीत गोठ्यातील स्प्रिंकलर पाइप, गुरांचा चारा तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी भेट दिली. मंडल अधिकारी मीना तडवी, तलाठी तडवी यांनी पंचनामा केला.