जळगाव : प्रतिनिधी
अयोध्यानगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात आर्थिक कारणावरून वाद झाल्याने एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संशयित आरोपी स्वतःहून पोलिस स्टेशनला जमा झाला आहे. मोहित सुनील चौधरी (२४, रा. भादली, ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी धीरज प्रल्हाद पाटील (२३, रा. हनुमान नगर) याच्याशी मोहितची मैत्री होती. दोघांमध्ये यापूर्वी आर्थिक देवाण-घेवाण झालेली होती. या कारणावरून बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरातील हनुमान मंदिराजवळ मोहित चौधरी हा आला असता धीरज पाटील याच्याशी त्याचा वाद झाला. या वादातच धीरज पाटील याने मोहितच्या पोटावर सपासप चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून मोहित चौधरी याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.