यावल : प्रतिनिधी
चोपडा रस्त्यावर सावखेडासीम या गावातून दोन ट्रॉल्यामध्ये ऊस भरून ट्रॅक्टर घेऊन जात असताना वाघोदा पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट पुलावरून नदीपात्रात कोसळले. या दुर्घटनेत ३२ वर्षीय चालक जागीच ठार झाला. २० वर्षीय क्लीनर हा गंभीर जखमी आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सावखेडासिम येथून दोन ट्रॉल्यांमध्ये ऊस भरून चालक राकेश जयराम बारेला (वय ३२, रा. छोटी शिरवेल, ता. सेंधवा, जि. बडवाणी मध्यप्रदेश) हा ट्रॅक्टर (एम. एच. १९/ सी. व्ही. ११२४) घेऊन हा चोपड्याला जाताना वाघोदा गावाजवळ नदीच्या पुलावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाले आणि थेट पुलावरून ते नदीत कोसळले. या अपघातामध्ये राकेश बारेला हा जागीच ठार झाला तर ट्रॅक्टरवरील क्लीनर राधेश्याम गंभीर बारेला (२०, रा. बोरअजंटी ता. चोपडा) हा गंभीर जखमी झाला. ट्रॅक्टरवरील नियंत्रण कशामुळे सुटले हे मात्र समजू शकले नाही.
अपघाताची माहिती मिळताच वाघोदा गावातील नागरिकांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने १०८ रुग्णवाहिकेला बोलवण्यात आले. मृतदेह आणि गंभीर जखमी राधेश्याम बारेला याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. सहर हमदुल्ले आदींनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. राधेश्याम बारेला याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी दिनकर तुकाराम महाजन यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात ट्रॅक्टरचालक राकेश बारेला विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहे.