नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरासह महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींनी विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले असून, सोशल मीडियावरदेखील शिवरायांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनीही पोस्टद्वारे छत्रपती शिवरायांच्या शौर्याला नमन केले आहे. पण, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी X वर पोस्ट करताना मोठी घोडचूक केली आहे. त्यामध्ये X (ट्विटर) वर अभिवादन करताना, छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी चक्क श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील X वरुन छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. मात्र, त्यांच्या पोस्टमध्ये मोठी घोडचूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहिली असल्याचे नमूद केले आहे. यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, नेटकऱ्यांनी यावर राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींच्या या पोस्टवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी ही चूक जाणूनबुजून झाल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी राहुल गांधींनी तात्काळ चूक सुधारावी अशी मागणी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या मुद्द्यावर चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली जाते आणि लाखो शिवभक्त महाराजांच्या कार्याचा जागर करतात.