मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र ज्यांना जाणता राजा म्हणत होता, त्यांनी कायम दुष्काळी भागाला पाणी देणे खर्चात बसत नसल्याची उत्तरे दिली होती, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने दुष्काळ मुक्तीसाठी काम करत आहेत, ते पाहता नुसत्या तुताऱ्या फुकून काही होत नसते, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. सांगोला येथे उपसा सिंचन भूमिपूजन सोहळ्यानंतर आयोजित मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेत शरद पवार यांच्यावर टीका केली.
पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सध्या राज्यात जवळपास दोन लाख कोटींचे सिंचन प्रकल्प व नदीजोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचे स्वप्न आम्ही पाहत असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी बोलताना विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संजय राऊत हे मनोरुग्ण आहेत. त्यांची जागा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. आता त्यांच्या नेत्यांनीच ते पहावे अन्यथा जनता त्यांना जागा दाखवेल. संजय राऊत यांनी संतोष देशमुख हत्येमागे भाजप आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर बोलताना विखे पाटील यांनी टीका केली. विरोधकांना महायुतीने मिळविलेला विराट विजय पचनी पडला नाही. त्यामुळे कोण काय बोलते याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे विखे पाटील यांनी म्हंटले आहे.