जळगाव प्रतिनिधी । शिवीगाळ का करतो असे विचारल्याच्या कारणावरून दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार केल्याची घटना तेली चौकात घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ पाण्याची टाकीजवळ हा शुक्रवारी १८ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत रंगपंचमी खेळत होता. यावेळी पप्पू मराठे व एका दुचाकीस्वारामध्ये वाद झाला. यावेळी नारायण कोळी याने हा वाद मिटवित तो सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घराकडे जात असतांना तेली चौकात पराग राजेंद्र पाटील (वय-१९) हा तरुण शिवीगाळ करीत होता. नारायण याने पराग याला शिवीगाळ का करतो असे बोलल्याने त्याचा राग आला. त्याने रागाच्या भरात आपल्या हातातील चॉपरने नारायण कोळी याच्यावर वार केले. यात नारायण याच्या हातावर, पाठीवर, डोक्यावर सुमारे पंधरा घाव लागले आहेत. तसेच हा वाद मिटवित असतांना नारायण याचा मित्र दीपक चौधरी उर्फ मच्छी याच्यावर देखील पराग याने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी शनिवार १९ मार्च रोजी दुपारी नारायण याच्या फिर्यादीवरून पराग राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी नारायण कोळी याला त्याच्या मित्रांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करीत असतांना याठिकाणी उपचारासाठी दाखल करणार्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात जखमी नारायण कोळी याच्यासह त्याच्या मित्राला या जमावाने मारहाण केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.