मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील असे सांगितले होते. मात्र, अद्यापही राजीनाम्याची कारवाई झालेली नाही. तसेच माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे विधान अजित पवार यांनी केले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिस्थितीवर भाष्य केले आहे. अजित पवार जे बोलतात ते खरे आहे. त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. तेव्हा, तुम्ही राजीनामा देऊ नका असे बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना सांगितले होते. महाराष्ट्राची परंपरा आहे, जेव्हा मोठे आरोप होतात आणि ज्यावेळी चौकशी लागते तेव्हा तो व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडतो. सत्तेच्या सोबत राहिलेल्या माणसाला पोलिसांचे अभय मिळते, त्यामुळे अजित पवारांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही, हे मनावर असते. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना एक इशारा दिला की, मी राजीनामा दिला होता. समोरच्याने समजून घ्यायला हवा की आपला पक्षप्रमुख म्हणतोय की मी राजीनामा दिला होता, याचा अर्थ तू पण दे. अजितदादांची घुसमट झाली आहे, त्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हंटले आहे.
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित दादा हताश होऊन बोलून गेले, अजितदादा बोलतात ते चांगले नाही. अजित दादा यांचा हेल्पलेसनेस दाखवतोय की, ते कधी एवढे असहाय दिसत नाहीत. मात्र, अजित दादा धनंजय मुंडेंच्या बाबतीत हिंमत का दाखवत नाहीत, हे मला माहित नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.