चोपडा : प्रतिनिधी
आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करून जमावाने हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. मारहाणीत पोलिस अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. ही थरारक घटना पार उमर्टी ता. वरला येथे शनिवारी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जमावाशी झालेल्या झटापटीत सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हेकॉ. शशिकांत पारधी, किरण पारधी आणि होमगार्ड विश्वास भिल्ल हे जखमी झाले आहेत. यापैकी शशिकांत पारधी यांचे जमावाने अपहरण केले होते. त्यांची नंतर सटका करण्यात आली. रात्री उशिरा पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (३०), राजेंद्रसिंग • प्रीतमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला, गुरुदेवसिंग लिवरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला व इतर (रा. पार उमर्टी ता. वरला, जि. बडवाणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पप्पीसिंग याला रात्रीच अटक करण्यात आली होती.
पोलिस पथक पार उमर्टी येथे पोहचले त्यावेळी संशयित पप्पीसिंग हा • पोलिसांना पाहून पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. त्याने आरडाओरड केल्याने काही जण जमा झाले. त्यांनी पोलिस पथकावर हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली. जमावातील एकाने हवेत गोळीबार केला. त्याचवेळी सपोनि नितनवरे हे तिथे 3 पोहचले. त्यांनाही जमावाने मारहाण केली. जमाव ऐकत नसल्याचे पाहून त्यांनीही हवेत गोळीबार केला. जमावाने सपोनि नितनवरे यांना चारीत फेकून दिले, तसेच यातील पोलिस नाईक शशिकांत पारधी यांना एका मोटारसायकलवर बसवून अपहरण केले. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे चोपड्यात पोहचले. त्यांनी वरला पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणी केली. यानंतर कॉ. पारधी यांची सुटका करण्यात आली.