मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यानं अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराडला अटक केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. माझ्यावर सिंचनाच्या आरोप झाले, तेव्हा मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही. मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते. मी गेल्या 34 वर्षांपासून अनेक खाते सांभाळली आहेत.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 1992 सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आले. माझी जन मानसात प्रतिमा मलीन करण्यात आली. त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटले की आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत आहेत. त्यानंतर मी राजीनामा दिला होता. तर काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे. या प्रकरणात आम्ही म्हणतोय की, दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल.
यानंतर पत्रकारांनी धनंजय मुंडे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत, असा प्रश्न अजित पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. आम्हाला कोणाला वाचवण्यासाठी जनतेने 237 आमदार निवडून दिलेले नाहीत. आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिलेले आहेत. त्या पद्धतीने आम्ही चांगले काम करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.