पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक शहरात जीबीएस आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने मोठी खळबळ उडाली असतांना आता जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे सोलापूर, नागपूरमध्ये जीबीएस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता गुलियन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस फक्त दुषित पाण्यामुळेच नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कच्चे मांस खाल्ल्यामुळे जीबीएसची लागण होत आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
“जीबीएस हा आजार पाण्यामुळे झाल्याची चर्चा होती. मात्र कोंबड्यांचे मांस खाऊन झाल्याचे पुढे येत आहे. पण लगेच आता तुम्ही कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. कमी शिजवलेल्या चिकनमधून जीबीएसचा धोका आहे. पोल्ट्री फार्ममधून नमुने घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये जीबीएसबाबत ही माहिती समोर आली असल्याची माहिती खडकवासल्याच्या नागरिकांनी मला दिली आहे,” असंही अजित पवार म्हणाले. जीबीएस आजारामुळे राज्यात दिवसभरात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील मिरज शासकीय रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका सहा वर्षाचा मुलाचा आणि 60 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय. तसेच दोघांवर सध्या आयसीयूत उपचार सुरु असल्याची माहिती आहे.
आतापर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यांत २०८ जीबीएस बाधित रुग्णांपैकी ४२ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून सर्वाधिक रुग्णसंख्या ९४ ही समाविष्ट गावांतील आहे. ३० रुग्ण पिंपरी- चिंचवड महापालिका, ३२ रुग्ण पुणे ग्रामीण, १० रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.