नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी येत असतांना दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १० जण जखमी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१५) रात्री १० च्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर जखमींना एलएनजेपी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र जखमींमधील १५ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ज्यामध्ये ११ महिला, दोन पुरूष व २ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींमधील काहींना लेडी हार्डिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर रेल्वे स्थानकाचा हा परिसर बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. ही दुर्दैवी घटना नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर घडली. रात्री १० च्या सुमारास या घटनेची माहिती मिळल्यानंतर रेल्वे प्रशासन, सुरक्षा कर्मचारी व चार अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द झाल्यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. अचानक रेल्वे रद्द झाल्याची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांचा गोंधळ उडाला. व ही दुर्दैवी घटना घडली. दिल्लीतून ‘महाकुंभ’ साठी प्रयागराजला जाण्यासाठी लोकांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती. यादरम्यान दोन रेल्वे गाड्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ‘महाकुंभ’साठी विशेष रेल्वे येत असल्याची घोषणा झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.