संगमनेर : वृत्तसंस्था
राज्यातील शिक्षण क्षेत्रातून अनेक खळबळजनक बातमी समोर येत असतांना आता संगमनेर शहरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मालदाड येथील माध्यमिक विद्यालयात किरकोळ वादातून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजे सुमारास घडली. यामुळे शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसांत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालदाड येथील एका माध्यमिक विद्यालयातील शिक्षिकेच्या पतीचा वाढदिवस गुरुवारी असल्याने पतीसाठी त्यांनी पुष्पगुच्छ आणून ठेवला होता. वाढदिवस साजरा केल्यावर शुक्रवारी हा पुष्पगुच्छ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेऊन जा, असे पतीने सांगितल्याने या शिक्षिकेने हा पुष्पगुच्छ शाळेमध्ये आणला होता. त्यांनी हा पुष्पगुच्छ शाळेतील मुलांना दिला. गुरुवारी दुपारी याच शाळेतील एक शिक्षक दत्तू किसन कोटे यांनी पुष्पगुच्छवरून या शिक्षिकेला टोमणे मारले. ज्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणला त्यांना तो मिळाला, असे ते म्हणाले. या शिक्षकाच्या वागण्याबद्दल संबंधित शिक्षकेने मुख्याध्यापक व शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. दरम्यान काल सकाळी या शिक्षकाने त्या शिक्षिकेची भेट घेऊन आपला उद्देश वाईट नव्हता असे सांगितले. यावेळी दोघांमध्ये वर्गातच वादावादी झाली.
या शिक्षकाने शिक्षकेला विद्यार्थ्यांसमोरच मारहाण केली. यामुळे काही काळ वर्गात वातवरण तापले, हा प्रकार इतर शिक्षकांना समजला. त्यांनी हा वाद मिटवला मात्र संतप्त झालेल्या या शिक्षिकेने थेट घुलेवाडी येथील तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. शिक्षकाविरुद्ध तिने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता संबंधित शाळेतील कमिटी काय कारवाई करते याकडे लक्ष लागुन आहे.