मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये गेल्या दोन दिवसापासून अंतर्गत शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. आता जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार आणि कौतुक केल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली होती. आता ही नाराजी नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी यू-टर्न घेतला आहे.
संजय राऊत यांनी नाराज असल्याचे सांगितले होते. शरद पवारांच्या नेत्यांनी टीका केल्यानंतर संजय राऊतांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत म्हणाले की, “शरद पवारांना आम्ही नेहमी मुंबईत भेटतो. शरद पवारांविषयी नाराजी असण्याच कारण काय?. आम्ही एका विशिष्ट घटनेपुरता आमची भूमिका मांडली. नाराजी व्यक्त केली नाही, टीका केली नाही. शरद पवारांबद्दल आमच्या मनात नाराजी नाही. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राने ज्याला गद्दार म्हणून संबोधित केलं, ज्याने बेईमानी करुन अमित शाहंशी हातमिळवणी करुन सरकार पाडलं. त्याचा सत्कार पवार साहेबांच्या हातून होणं हा पवार साहेबांचा अपमान आहे” असे मत खासदार राऊतांनी व्यक्त केले आहे.
पुढे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आम्हाला असे प्रश्न केले की, आम्ही पवार साहेबांवर टीका करतोय. माझे आणि पवार साहेबांचे संबंध यांना माहित नाहीत. ते आम्हाला पित्यासमान आहेत. पण मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली. शरद पवारांवर टीका केली नाही” असं संजय राऊत म्हणाले. “शिंदे गटाला आलेला पवार साहेबांचा पुळका खोटा आहे. अमित शाह महाराष्ट्रात येऊन शरद पवारांवर टीका करतात. अमित शाह बोलतात पवार साहेबांनी सहकाराचा बट्टयाबोळ केला, लूट केली, त्यावेळी पवार साहेबांचा अपमान झाला नाही का?. मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले, तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसली होती का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली नसती, तर अजित पवार फुटले नसते, सरकार कोसळलं नसतं. त्यामुळे मी जी भूमिका मांडतोय ती शरद पवारांची भूमिका असायला हवी. एकनाथ शिंदे या माणसाने अमित शाहंशी हातमिळवणी करुन पक्ष फोडले, तुम्ही त्याची भलामण करताय. मी बोललो, माझ्यात हिम्मत आहे, हे ढोंगी, भंपक लोक आहेत. मला अजिबात पोटदुखी नाही. शरद पवारांनी तिथे जाणं महाराष्ट्राला रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना पटलेलं नाही. त्यांना महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणं, हा शूर योद्धा जो दिल्लीपुढे कधी झुकला नाही, त्या महादजी शिंदे यांचा अपमान आहे, ही आमची भूमिका आहे”, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.