भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील चक्रधर नगरातील गायत्री मंदिराच्या मागील भागात संजय सुकलाल परदेशी यांच्या गिफ्ट फॅशन डिझायनिंग या कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता आग लागल्याने तब्बल ३५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, यावेळेस परदेशी हे तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते तर त्यांची पत्नी रंजना परदेशी हे बाजारात गेल्या होत्या. तेव्हा या कंपनीत त्यांचे १५ लाख रुपयांचे इंडस्ट्रियल गारमेंट मशीन, पाच लाखांचे रॉ मटेरियल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फर्निचर टीव्ही, केबिन वायरिंग, कुलर आदी साहित्य जळून खाक झाले. शेजाऱ्यांना धुराचे व आगीचे लोट उठताना दिसल्यावर त्यांनी त्वरित ही माहिती परदेशी यांना कळविली. आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेचे तीन अगनिबंब पाचारण करण्यात आले होते. दोन तासात आग आटोक्यात आली. माजी नगरसेवक पिंटू कोठारी, बोधराज चौधरी, नितीन धांडे, पुरुषोत्तम नारखेडे, रवी ढगे, महेंद्र चौधरी यांनी मदतकार्य केले..