धरणगाव : प्रतिनिधी
सरकार नेहमीच जनतेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते काही ठिकाणी योग्य जनतेला लाभ मिळतो तर काही ठिकाणी या योजनेवर नको ते लोक डल्ला मारीत असतात अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चिंचपूरा येथे घडली आहे. पत्नी गावची सरपंच असलेल्या चिंचपूरा येथील ग्रामपंचायत सदस्याने आईला कुटुंबातून विभक्त दाखवून तिच्या नावे घरकुलाचे अनुदान लाटल्याचा आरोप धरणगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे करण्यात आले. या प्रकरणी पंचायत समितीने दिलेल्या चौकशी अहवालात अनुदान परत करण्यात आल्याचे आणि दोषी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. तथापि, तक्रारदाराकडून या अहवालावर संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचपूर येथील ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील यांच्या पत्नी गावच्या सरपंच आहेत. दोघेही ग्रामपंचायतीच्या पदावर असून त्यांनी आई जिजाबाई पाटील यांना कुटुंबातून विभक्त दाखवून घरकुल अनुदान मिळवले. त्यानंतर, विनोद पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती की, अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे. त्यानुसार समितीने चौकशी केली आणि अहवाल सादर केला. या अहवालात, लाभार्थ्यांनी अनुदान परत केल्याचा आणि ते विभक्त राहत असल्याचा दावा केला आहे. तथापि, तक्रारीसोबत जोडलेल्या पुराव्यात संपूर्ण कुटुंबाचे रेशनकार्ड एकच असल्याचे दिसून आले आहे.
चिंचपूर येथे अनेक लाभार्थी घरकुलांपासून वंचित असताना, प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामपंचायतीकडून चुकीच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले आहे. यामुळे तक्रारदार विनोद पवार यांनी ग्रामसेवकासह लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चुकीच्या पद्धतीने शासकीय योजनेचा लाभ घेतल्यामुळे सरपंच पदावरून अपात्र ठरल्याचे सांगत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बळी घेवून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न पंचायत समितीकडून केला जात असल्याचा आरोप केला आहे. तक्रारदारांनी आता न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
लाभार्थ्यांनी मागणी न करता घरकुल मिळवले असल्याचे चौकशी दरम्यान सांगितले होते. तथापि, हे अनुदान ठरवून मिळविण्यात आले असून, तक्रारदार विनोद पवार यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. चौकशी समितीच्या शिफारशींवरून दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यावर, या प्रकरणात गुंढाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.