अमळनेर : प्रतिनिधी
बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, भोईवाडा येथील रहिवासी बापू शिंगाणे हे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह ते बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी दुचाकीला टांगली आणि पिशवी स्वतःकडे ठेवून घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता, काळ्या दुचाकीवरून दोघेजण आले आणि त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून कसाली डीपीकडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलिस निरीक्षक विकास देवरे, पोउनि. नामदेव बोरकर, मंगल भोई, विनोद संदनशिव, अमोल पाटील, नितीन कापडणे, रवींद्र पाटील, पूनम हटकर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली…
दरम्यान, या चोरट्यांचे फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून त्यावरून हे चोरटे महाराष्ट्रीय नसून आंध्रप्रदेश येथील असल्याचा कयास पोलिसांनी काढला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास पथके तयार केली आहेत. बापू शिंगाणे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करत आहेत