प्रविण पाटील प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे ग्राम सुरक्षा दल स्थापनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे म्हणाले की, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करतांना तरुणांची सदस्य म्हणून निवड करतांना सदर तरुणांनवर कोणताही गुन्हा दाखल नसावा किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, ग्राम सुरक्षा दलात सर्व जाती धर्माचे सदस्यांचा समावेश असावा, ग्राम सुरक्षा दलात काम करणाऱ्या तरुणांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपयोगी साहित्य जसं शिटी, काठी व टिसर्टसाठी मदतीच आवाहन केले. यावेळी म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व तरुण यांना ग्राम सुरक्षा स्थापनेचे उद्देश ग्राम सुरक्षा दलाचे कार्याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी म्हसावदचे सरपंच गोविंद पवार , जळके चंद्रभान मोरे (सरपंच), वसंतवाडी रविंद्र पाटील (सरपंच), बोरणार पोलिस पाटील शेखर पाटील, विटनेर गावाचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबु पिंजारी या सर्व मान्यवरांनी मेळाव्यात आपण स्व खुशीने व स्व खर्चाने ग्राम सुरक्षा रक्षक दलातील तरुणांना शिटी, काठी व टिसर्ट देणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे , गोपनीय शाखेचे एएसआय विश्वास बोरसे, पो.हे.कॉ.राजेंद्र खांडेकर, पो.हे.कॉ.दिपक चौधरी तसेच म्हसावद पोलिस स्टेशनचे इन्चार्ज ए.एस.आय. राजेंद्र उगले, पो.हे.कॉ. आबा महाजन, पो.हे.कॉ.नाना बागुल, पो.कॉ.स्वप्नील पाटील व पो.कॉ. हेमंत पाटील असे अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या पोलिस स्टेशनच्या हद्दीत म्हसावद, बोरणार, वाकडी, लमांजन, वावडदा, रामदेववाडी, डोमगाव, बिलवाडी, बिलखेडा, वडली, पाथरी, जवखेडा, विटनेर, वराड, सुभाषवाडी, लोणवाडी, जळके तसेच वसंतवाडी या गावांचा समावेश आहे.