मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण मंत्री मुंडे यांच्या अंगलट येत असतांना दिसत आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राज्याचे राजकारण तापले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या कि, धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दमानिया यांनी पोलखोल केली. या योजनेअंतर्गत सरकार जे पैसे देते, त्या योजनांचा दुष्परिणाम होतोय, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा दावा दमानिया यांनी केला. धनंजय मुंडे हे मंत्री होण्याच्या योग्यतेचे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
अंजली दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी खात्याने केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले. शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले नाहीत. तर या प्रक्रियेला वगळून महाबीज, केव्हीके आणि एमएआयडीसीच्या योजनांसाठी उपकरण खरेदी केली. त्यासाठी चक्क टेंडर काढले. बाजारभावाच्या दुपटीने खरेदी केली. विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
अंजली दमानिया म्हणाल्या की, डीबीटीनुसार पैसे गेले तर ते शेतकऱ्यांना जातील कृषीमंत्री कसा श्रीमंत होणार असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. यासाठी हा सर्व खेळ केला गेलेला आहे. हे सर्व सांगितल्यानंतर तर भगवानगडाने धनंजय मुंडे यांचा पाठिंबा काढून घ्यावा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. कंपन्याकडून डायरेक्ट माल घेता येत असताना वितरकांनामध्ये टाकण्यात आले. त्यातून हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बाटल्यांमध्ये घोटाळा झाला असा आरोप सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. 88 कोटी रुपयांचा हा घोटाळा झाला असे म्हणत वर्षभरात मुंडेंनी शेतकऱ्यांचा अफाट पैसा खाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निविदा कुणाला द्यायचे हे आधीच ठरले होतं का? कारण कापूस साठवणुकींच्या बॅगेचे पैसे दिले आणि मग निविदा काढण्यात आली. पैसे देण्याची एवढी घाई का झाली होती असा सवालही त्यांनी केला आहे.