मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात बीड खुन प्रकरणी वातावरण तापले असतांना आता दुसरा वाद समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या एका वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले,” असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला. यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा उल्लेख केला होता. याबाबत ते म्हणाले होते की, “त्यावेळी पेटारे-बिटारे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रा येथून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलादेखील लाच दिली होती. महाराजांनी औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र घेतलं होतं. तो परवाना दाखवून महाराज आग्रा येथून बाहेर पडले होते.’ त्यांच्या या वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
अमोल मिटकरी यांचे ट्वीट
अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ”छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून स्वकर्तुत्वावर निसटले. हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल”, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला. पुढे मिटकरी यांनी लिहिले की, ”राहुल सोलापुरकर याने आपण ‘टकलू हैवान’ असल्याचं सिद्ध केलं आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करत आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे. हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतल्या जाणार नाही”, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.
तर ” छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय”, अशा तीक्ष्ण शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली आहे.