नंदूरबार : वृत्तसंस्था
खान्देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच चेन्नई-जाेधपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान जागेच्या वादातून राजस्थानमधील रहिवासी असलेल्या दोघांवर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेत एका प्रवाशाचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमवारी येथील जिल्हा रुग्णालयात समाजबांधवांनी आक्रमक होत जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच पडून होता.
सविस्तर वृत्त असे कि, चेन्नईहून जोधपूरकडे प्रवास करत असताना बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने सुमेरसिंग जबरसिंग व सहकारी प्रवासी प्रबंतसिंग डोंगरसिंग परिहार (दोघे रा. बाकेसर, जि. जोधपूर, राजस्थान) या दोघांना येथील रेल्वेस्थानकावर सात ते आठ जणांच्या जमावाने मारहाण केली. संशयितांनी दोघांवर चाकूने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी नंदुरबार स्थानकावर घडला. त्यांना लोहमार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुमेरसिंग जबरसिंग (२७) याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. अतिरक्तस्रावामुळे रविवारी रात्री उशिराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयितांच्या शोधासाठी शहरात पोलिसांनी नाकेबंदी केली. मात्र सोमवारी उशिरापर्यंत त्यांना यश मिळाले नव्हते. पोलिसांनी रात्रीच संशयितांविरुद्ध कलम ११८ (१), ११८(२), १८९, १९१, १०३ यानुसार गुन्हा दाखल केला.
अर्धा ते पाऊण तासाच्या खोळंब्यानंतर चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेस जोधपूरकडे रवाना करण्यात आली. या घटनेच्या काही क्षणात रेल्वेच्या लोहमार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हल्लेखोरांनी वापरलेले धारदार शस्त्र जमा केले आहे. दरम्यान, या गदारोळानंतर काही रेल्वेगाड्यांनाही उशीर झाल्याचे सांगण्यात आले. सुमेरसिंग याचा २० फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. सुमेरसिंगसह त्याचा भाऊ व त्याचे गावातील काही मित्र चेन्नई येथे मिठाई विक्री करून उदरनिर्वाह करतात. विवाह सोहळा १५ दिवसांवर अाल्याने भावी जीवनाचे स्वप्न रंगवत सुमेरसिंग हा आपल्या घरी गावाकडे निघाला होता. मात्र, त्या आधीच ही घटना घडली. त्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.