जळगाव : प्रतिनिधी
दुचाकीवर जात असताना अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याने संजय पुंडलिक नारखेडे (५५, मूळ रा. ममुराबाद, ह.मु. एमआयडीसी परिसर) हे ठार झाले तर त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना संजय नारखेडे (४१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी (३ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेमंड चौकात झाला.
सविस्तर वृत्त असे कि, मुमराबाद येथील मूळ रहिवासी संजय व ज्योत्स्ना नारखेडे हे दाम्पत्य एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये कामाला आहे. सोमवारी रात्री ते लग्न सोहळ्यावरून परत येत असताना रेमंड चौकात अपघात झाला. घटनेनंतर दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे संजय नारखेडे यांना मयत घोषित करण्यात आले तर त्यांच्या पत्नीच्या डोक्याला, पायाला जबर दुखापत होऊन त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे, मात्र समोरील वाहन नेमके कोणते होते हे कुटुंबीय व मित्र परिवाराला समजू शकले नव्हते. एमआयडीसी पोलिस घटनेचा तपास करीत आहे.