पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी वालिमक कराड गैंगशी संबंध आदी मुद्यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून, याचा आम्ही निषेध करतो याप्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यामिक व वारकरी आघाडीने पत्रकार परिषदेत दिला,
या पत्रकार परिषदेत आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल मोरे, राज्य उपाध्यक्ष मुबारकभाई शेख, राज्य युवा संपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे, आळंदी शहर अध्यक्ष हभप दत्तात्रेय महाराज साबळे, मुस्लिम संत विभागाचे संपर्कप्रमुख राजूभाई इनामदार आदी उपस्थित होते.
मोरे म्हणाले, शास्त्री यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला असे म्हटले असले तरी कोणताही विपर्यास नाही. त्यांनी माझे विधान मागे घेतो आणि माफी मागतो असे सर्वांसमोर सांगावे. येत्या आठ दिवसात हे झाले नाही तर राज्यभर आंदोलन करणार आहोत, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.
लवटे म्हणाले, शास्त्री बुवांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे उघड समर्थन केले आहे, धनंजय मुंडेंशी यांच्या मानसिकतेचा विचार करता पण संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का?, धनंजय मुंडे गुन्हेगार नाही तर बाकी घोटाळ्याचे काय?, धनंजय मुंडेंमध्ये संत दिसत असेल तर भगवानगडाचे महंतपद त्यांना देणार का?, आदी प्रश्न ही मोरे यांनी यावेळी उपस्थित केले.