शिर्डी : वृत्तसंस्था
साई संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली असून या दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत तिघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. यात दोघांचा या घटनेत मृत्यू झाला असून तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई संस्थानचे दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सुभाष साहेबराव घोडे (वय ४५) आणि नितीन कृष्णा शेजुळ (वय ३२) साई संस्थानच्या या दोन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची घटना साकुरी शिवावर घडली. तर तिसरे कृष्णा देहरकर यांच्यावर नादुर्खी रोडवर हल्ला झाला. त्याच्यावर लोणीतील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच दिवशी झालेल्या तिघांवरील हल्ल्याने शिर्डीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घटनेची माहिती देऊनही ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघात सांगून त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं. यामुळेच पुढील घटना वाढल्या असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं असून शिर्डी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केली आहे.