नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाने आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले. रविवारी (2 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 83 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी फक्त 11.2 षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाच्या विजयात गोंगाडी त्रिशाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्रिशाने गोलंदाजीत तीन विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत नाबाद 44 धावा केल्या. भारताने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या स्पर्धेत भारतीय संघ शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला होता.
अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. जी कमलिनी आणि गोंगाडी त्रिशा या सलामी जोडीने 4.3 षटकांत 36 धावा कुटल्या. कमलिनीला 8 धावांवर बाद झाली. तिला कायला रेनेकेने सिमोन लॉरेन्स करवी झेलबाद केले. यानंतर त्रिशा आणि सानिका चालके यांनी शानदार भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. त्रिशाने 33 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 44 धावा केल्या. तर सानिका 26 धावांवर नाबाद परतली.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजांनी प्रोटीज संघाचा हा निर्णय चुकीचा ठरवला. द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. त्यांचा संपूर्ण संघ 20 षटकांत 82 धावांवर ऑलआउट झाला. द. आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात डावखुरी फिरकी गोलंदाज पारुनिका सिसोदियाने सिमोन लॉरेन्सला (0) बाद केले. त्यावेळी द. आफ्रिकेचा स्कोअर 11 होता. यानंतर मध्यमगती गोलंदाज शबनम शकीलने दुसरी सलामीवीर जेम्मा बोथाला विकेटमागे झेलबाद केले. बोथाने 14 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. डावखुरी फिरकी गोलंदाज आयुषी शुक्लाने दियारा रामलकनला (3) बाद करून दक्षिण आफ्रिकेला 20 धावांवर तिसरा धक्का दिला.
द. आफ्रिकेच्या विकेट पडण्याचा क्रम सुरूच राहिला. पार्टटाइम फिरकी गोलंदाज गोंगाडी त्रिशाने कर्णधार कायला रेनेके (7) हिला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर, काराबो मेसो (10)ची विकेट आयुषी शुक्लाने घतली. 44 धावांत निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर, मिके व्हॅन वुर्स्ट आणि फेय काउलिंग यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघींमध्ये सहाव्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी झाली.
त्यानंतर गोंगाडी त्रिशाने एकाच षटकात दोन विकेट घेऊन द. आफ्रिकेची परिस्थिती पुन्हा बिकट केली. त्रिशाने मिके व्हॅन वुर्स्टला (23) यष्टीचीत केले. त्यानंतर शेषनी नायडूला (0) बाद केले. डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माने तिच्या एकाच षटकात फेय काउलिंग (15) आणि मोनालिसा लेगोडी (0) यांना तंबूत पाठवले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर, पारुनिका सिसोदियाने अॅशले व्हॅन विक (0) ची शिकार करून द. आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून गोंगाडी त्रिशाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर वैष्णवी शर्मा, पारुनिका सिसोदिया आणि आयुषी शुक्ला यांना प्रत्येकी दोन बळी घतले. भारताकडून, या सामन्यात फिरकीपटूंनी एकूण 9 विकेट्स घेतल्या.
निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय कनिष्ठ युवा महिला संघाने या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना आपल्या कामगिरीत सातत्य राखले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्व म्हणजे सातही सामने जिंकले. भारताने विंडीजचा 9 गड्यांनी, मलेशियाचा 10 गड्यांनी, लंकेचा 60 धावांनी, बांगलादेशचा 8 गड्यांनी, स्कॉटलंडचा 150 धावांनी आणि उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव केले. तर अंतिम सामन्यात द. आफ्रिकेला मात दिली.